कवी संजय निकम यांनी महाराष्ट्र भूषण माय मराठी हा काव्य संग्रह समीक्षणार्थ स्नेहपूर्वक पोस्टाने पोहच केला.शीर्षकच लक्ष वेधून घेते महाराष्ट्राची बोलीभाषा मराठी, राज्यात जवळपास ६५ प्रतिशत जनता मराठी लिहिते, बोलते.मायमराठी चा गोडवा अवीट आहे. इ. स. ७८० च्या सुमारास मरहट्ट नावाने कवलयमाला ग्रंथात तिचा उल्लेख आहे.माय मराठी काव्यसंग्रहात ६२ कविता समाविष्ट आहेत.’दुर्जना माथी काठी देई मराठी ‘ हा मराठीचा समर गुणधर्म वेळोवेळी सिद्ध झाला आहे.राकट,रांगडी, कणखर मराठी, दुर्जनांचा संहार करण्यासाठी दुर्गेच्या करकमलात तलवार रूपाने ती तळपत राहील आहे.
सदर संग्रहातील काव्य प्रतिभेचे अवकाश अतिशय व्यापक व विस्तारित असल्याचे वाचताना लक्षात येते, संजय निकम हे कवी आहेत, शिवाय उत्कृष्ट वक्ता, सामाजिक कार्यकर्ता, संघटक असल्याने त्यांची वैचारिक ठेवण भक्कम आहे ते वाचकांशी संवाद साधताना भाववीवश होतात
“किती शिवता शिवता
हे उरच आहे फाटले
माणसातल्या माणुसकीचे
गंगाजल हे आटले”हा आत्मशोध घेणारा कवी आहे .
निसर्ग,शेतीवाडी, सामाजिक दंभ, अरिष्ट, रूढी परंपरा मानवी मूल्यांची पडझड ढासळत चाललेली राजकीय व्यवस्था, इत्यादी विषयांवरच्या समावेशक कविता कवी मनाचे विविध पैलू अधोरेखित करतात.
“सडलेल्या मनाची ही किडलेली माणसे
यापरी बरी ती,
मातीतून उगवलेली कणसे ”
संजय निकम यांचा द्रोह अत्यंत प्रखर आहे ते वाढता जूलूम तेवढ्याच त्वेषाने मांडताना,”सुन्न झाले रस्ते,मरण झाले सस्ते, भ्रष्टाचाराची मोठी धूम,,तर थय थय नाचतो जुलूम,”
सर्व स्तरातील जुलुमाने परिसिमा गाठली आहे महिलांवरील अत्याचार, गुंडागर्दी , झुंडशाहीचे आक्रमण नित्यनेमाने होते आहे, याविरोधात एकाकी लढतानाची झुंजार वृत्ती व्यक्त करणारी कविता,
“अबलांवर रोज चे बलात्कार
न्याय मुका आंधळा गपगार
असल्याचीच जीत,सत्याची हार
लढतो ईथे एकच झुंजार”
कवी न्याय व्यवस्थेवर चपराक ओढतो.संजय निकम यांच्या काव्यप्रतिभेवर बा. भ बोरकर,भा रा तांबे, कुसुमाग्रज व ना.धों.चा प्रभाव जाणवतो.
“हिरवा आकाश, हिरवा ध्यास, हिरवे हिरवे सारे आकाश” (हिरवाई)
‘आनंदी आनंद
ढगांचा फंद,भुई ही दंग,
पाखराला छंद आनंदी आनंद’
“जांभळाला जोर, चिंचेला मोहोर,उंचावे भोर, हसली बोर”(आक्रंद)
आदी निसर्ग कविता पुष्ट्यर्थ नोंद घेण्याजोग्या आहेत.एकंदर निसर्गाच्या सानिध्यात रमणारा हा कवी आहे. महाराष्ट्र म्हणजे संत महंत, महापुरुषांची खाण, अध्यात्म, पुरोगामीत्व,शांती, वैश्विक समतेची शिकवण देणाऱ्या महापुरुषांची मांदियाळीच महाराष्ट्राला लाभलेली आहे.
हा गौरवशाली इतिहास दृगोचर करणार्या निम्ननिर्दैशीत रचना संग्रहाची उंची शीर्षस्थानी नेऊन ठेवतात.पंढरीचा राजा, गोकुळाचा कान्हा, हिंदू हृदय सम्राट,शिव छत्रपती, स्वामी विवेकानंद,वीर मुरारबाजी, बाजीप्रभू देशपांडे, संजीवन समाधी, सत्ताधारी सत्ता स्पर्धेत संसदीय लोकशाही मूल्यांना हरताळ फासून निगरगट्ट झाले आहेत. हिणकस बीभत्स राजकारण शिष्टाचार झाला आहे या वृतीवर सडेतोड आसूड ओढणार्या कवितांचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते.
“सत्तेचाच धावा, सत्ता हीच मावा, सत्तेसाठी कावा असे आमुचा”(सत्ता)
“प्रतिकार ”
‘आश्वासनांचा भडीमार
लुटारूंचा बाजार
सत्यवाद्यांचा प्रतिकार’
“अन्यायाची वस्ती
गरीबांना धास्ती
जूलमी हस्ती
सत्तेला मस्ती “(मस्ती)
चपखल प्रतिमा,प्रतिक,रुपक व मुक्तछंदातील दमदार कविता संग्रहात शब्दबद्ध केल्या आहेत. कवितेची मांडणी सहज सुंदर वाचकांना संकर्षित करणारी असून रेखाटने, छायाचित्रे आशयसंपन्न असल्याने सौंदर्य स्थळ वाढवितात.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला आहे. त्यासाठीच्या प्रयत्नात कवी संजय निकम यांचाही खारीचा वाटा आहे. हे अभिमानाने नमुद करावेसे वाटते, मराठी भाषा जीवंत ठेवण्यासाठी शिक्षणात मातृभाषा मराठी चा समावेश करावा यासाठी ते आग्रही भूमिका मांडतात.
प्रस्तुत काव्यसंग्रहाला डॉ नरसिंह कदम यांची समर्पक, व्यासंगी. प्रस्तावना लाभली आहे. जे जे वाईट, विद्रुप, विकृत या सर्व अपप्रवृत्ती चा बीमोड करण्यासाठी हा काव्य संग्रह प्रेरणादायी ठरणार आहे, प्रसिद्ध कवी संतोष कांबळे यांनी सापेक्षी पाठराखण केली आहे. मालेगाव येथील नगारा प्रकाशनाने सुबक मांडणी व आकर्षक सेटींग केलेला आगळावेगळा काव्यसंग्रह वाचकांना उपलब्ध करून दिला आहे.
मराठमोळ्या संस्कृतीचा, माणुसकी धर्माचा आग्रह धरणार या काव्यसंग्रहाचे वाचक, संशोधक व अभ्यासक नक्कीच स्वागत करतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. मित्रवर्य कवी संजय निकम यांच्या साहित्यिक वाटचालीसाठी आभाळभर शुभेच्छा!!!!
समीक्षक: विद्रोही कवी साहेबराव मोरे चाळीसगाव ९४०४०४८६०१
महाराष्ट्र भूषण माय मराठी: काव्यसंग्रह
कवी: संजय निकम
प्रकाशन: नगारा प्रकाशन. मालेगाव